नवी दिल्ली: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे लीग सामने संपले आहेत. 15 नोव्हेंबरपासून उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना मुंबईत न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्याशी होईल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया 16 नोव्हेंबरला भिडतील. लीग स्टेज संपल्यानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) विश्वचषक 2023 च्या सर्वोत्कृष्ट अकरा खेळाडूंची निवड केली आहे, ज्यामध्ये विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आले आहे, तर रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडू म्हणूनही रोहितला संघात स्थान दिलेले नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या 12 सदस्यीय संघात भारताच्या 4 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झम्पा यांचा समावेश करण्यात आला आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम आणि मार्को जॅन्सन या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रला स्थान मिळाले आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका 12 वा खेळाडू म्हणून स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
रोहितच्या विश्वचषकात 500 हून अधिक धावा
कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित शर्माची 2023 च्या विश्वचषकात कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या विश्वचषकात त्याने 500 हून अधिक धावा केल्या आहेत, तर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 9 सामने जिंकले आहेत. विराट कोहली सध्याच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. गोल्डन बॅटच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. रोहित विश्वचषकात सलग 9 सामने जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. सर्वत्र रोहितच्या फलंदाजीचे कौतुक होत असतानाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) त्याला आपल्या संघातून वगळून चाहत्यांची निराशा केली आहे.