मुंबई: क्रिकेट जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. डोपिंगविरोधी उल्लंघनामुळे एका स्टार क्रिकेटरवर बंदी घालण्यात आली आहे. निरोशन डिकवेल्ला असे या खेळाडूचे नाव आहे. लंका प्रीमियर लीग 2024 (LPL) दरम्यान कथित डोपिंग विरोधी उल्लंघनामुळे निरोशन डिकवेल्लावर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास सुरू असताना यष्टिरक्षक-फलंदाजवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली जाऊ शकते. त्याच्या शिक्षेच्या मर्यादेबाबत लवकरच औपचारिक घोषणा अपेक्षित आहे.
वृत्तानुसार, देशांतर्गत टी-20 लीगदरम्यान निरोशन डिकवेल्ला डोपिंगविरोधी चाचणीत अपयशी ठरला होता. डिकवेल्ला या स्पर्धेत गॅले मार्व्हल्सचा कर्णधार होता. त्याने या लीगच्या 10 डावांमध्ये 153.33 च्या स्ट्राइक रेटने केवळ 184 धावा केल्या. त्यांचा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता, पण जाफना किंग्जकडून त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. डिकवेल्लाने अंतिम फेरीत आठ चेंडूंत केवळ पाच धावा केल्या.
ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही निरोशन डिकवेल्ला वादात सापडला आहे. 2021 मध्ये, इंग्लंडमध्ये बायो-बबल उल्लंघनामुळे दानुष्का गुनाथिलका आणि कुसल मेंडिससह त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यानंतर तो बराच काळ संघाबाहेर होता. 2023 च्या सुरुवातीला त्याने शेवटची कसोटी खेळली आणि 2022 मध्ये त्याचा शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
निरोशन डिकवेलाने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 54 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 30.97 च्या सरासरीने 2757 धावा केल्या आहेत, ज्यात 22 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यात त्याने 31.45 च्या सरासरीने 1604 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर टी-20मध्ये 480 धावा आहेत. श्रीलंका क्रिकेटसाठी गेले काही दिवस काही खास राहिलेले नाहीत. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेचा खेळाडू प्रवीण जयविक्रमावर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन प्रकरणी तीन आरोप लावले होते. जयविक्रमा यांच्याकडे आरोपांना उत्तर देण्यासाठी 6 ऑगस्ट 2024 पासून 14 दिवसांचा अवधी आहे.