मुंबई : भारताने दिलेल्या ३०७ धावांचा यशस्वी पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ३ लढतीच्या मालिकेत भारताला पराभूत करताना १-० अशी आघाडी घेतली. टॉम लॅथमने व केन विल्यमसन यांनी केलेल्या दमदार फलंदाजीने ही लढत न्यूझीलंडला जिंकता आली.
ऑकलंड येथील मैदानावर झालेल्या लढतीमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ३०७ धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंड संघाने ४७. १ षटकांत ३०९ धावा करताना विजय साकारला.
न्यूझीलंडचे सलामीवीर फिन अॅलन व डेव्हन कॉन्वे यांनी ७. ३ षटकांत ३५ धावांची सलामी दिली. फिन अॅलनने २५ चेंडूत २२ धावांची तर डेव्हन कॉन्वेने ४२ चेंडूत २४ धावा केल्या.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या केन विल्यमसनने एकाबाजूने किल्ला लढवायला सुरुवात केली. मात्र त्यावेळी साथीदार डॅरिल मिचेल ११ धावा करून ८८ धावा फलकावर लागल्या असताना बाद झाला.
त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी आलेल्या टॉम लॅथमबरोबर केन विल्यमसनची जोडी जमली. दोघांनी २२१ धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला विजय मिळवून दिला.
टॉम लॅथमने आक्रमक फलंदाजी करताना १०४ चेंडूत १९ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने १४५ धावांची नाबाद खेळी केली. त्याला कर्णधार केन विल्यमसनने ९८ चेंडूत ९४ धावांची खेळी ७ चौकार व एका षटकारांच्या साहाय्याने सजविली.
भारताने या लढतीत केवळ पाचच गोलंदाजांचा वापर केला. जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकने १० षटकांत ६६ धावांच्या बदल्यात २ गाडी बाद केले.
शार्दूल ठाकूरने ९ षटके टाकताना ६३ धावा देताना १ बळी मिळविला. हा १४५ धावांची वादळी खेळी करणाऱ्या टॉम लॅथमला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.