नवी दिल्ली – वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दमदार कामगिरी करून दाखवलीय. अमेरिकेत सुरू असलेल्या या चॅम्पियनशिपच्या गट फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात त्याने 88.39 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर आता पर्यंत कोणताही खेळाडू त्याच्यापेक्षा जास्त अंतर कापू शकला नाही.
पहिल्यादांच नीरज चोप्रानं वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. नीरज चोप्राची त्याच्या कारकिर्दीतील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आता भारतासाठी पदक जिंकण्यासाठी नीरज चोप्रा रविवारी मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार, रविवारी सकाळी 7.05 मिनिटांनी अंतिम फेरीला सुरुवात होईल.
दरम्यान, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत खेळाडूंना दोन गटात ठेवण्यात आले होते. या दोन्ही गटातील सर्वोत्तम 12 खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळणार होते. ऑटोमेटिक क्वालीफिकेशनसाठी 83.50 मीटर स्केल निश्चित करण्यात आलं होतं. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात हा टप्पा पार करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याला अ गटात स्थान देण्यात आले.