मुंबई: 2024 रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. विजेतेपदाच्या लढतीत विदर्भाची अवस्था अत्यंत वाईट आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईने दुसऱ्या डावात दोन गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. आता मुंबईची एकूण आघाडी 260 धावांची झाली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे 58 आणि मुशीर खान 51 धावांवर नाबाद आहेत.
सध्या सामन्यावर मुंबईची पकड घट्ट आहे. रणजी करंडक स्पर्धेतील मुंबईची ही 48वी फायनल आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली संघ 42वे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करत आहे. तर विदर्भाने आतापर्यंत केवळ दोनदाच रणजी करंडक जिंकला आहे.
रणजीच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबईला पहिल्या डावात केवळ 224 धावा करता आल्या. मात्र, एकवेळ अवघ्या 111 धावांत संघाने 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र, शार्दुल ठाकूरने 75 धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. त्यानंतर मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत संपूर्ण विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत गुंडाळला. गोलंदाजीत मुंबईकडून शम्स मुलाणी, तनुष कोटियन आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
पहिल्या डावात 119 धावांची आघाडी मिळविल्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ 11 आणि भूपेन लालवानी 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. विदर्भ या सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते, मात्र त्यानंतर मुशीर खान आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 107 धावांची भागीदारी करत सामन्यात मुंबईची आघाडी भक्कम केली.
रहाणे 109 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 58 धावांवर खेळत आहे. युवा मुशीर खान 135 चेंडूंत तीन चौकारांसह 51धावांवर खेळत आहे. दुसरीकडे, मुशीरचा भाऊ टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, मुशीर मुंबईसाठी सातत्याने धावा करत आहे.