कानपूर: कानपूर कसोटीत पहिले तीन दिवस पाऊस होता, मात्र चौथ्या दिवशी बांगलादेशचा डावखुरा फलंदाज मोमिनुल हकने आपल्या फलंदाजीने बांगलादेशी चाहत्यांची मने जिंकली. या डावखुऱ्या फलंदाजाने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. मोमिनुलने भारताच्या भक्कम गोलंदाजीचा सामना करत शतक झळकावले. मोमिनुलने आपल्या कसोटी कारकिर्दीत 13व्यांदा शतक झळकावण्याचा पराक्रम केला. कानपूर कसोटीत ऋषभ पंत या खेळाडूच्या उंचीची खिल्ली उडवत होता, पण मोमिनुलने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.
पंतने उडवली होती खिल्ली
मोमिनुल हकची उंची फक्त ५ फूट २ इंच आहे. कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विनच्या चेंडूवर स्वीप करताना चेंडू मोमिनुलच्या हेल्मेटला लागला. यानंतर पंतने विकेटच्या मागून म्हटलेच की, हेल्मेटवर चेंडू लागल्यानंतरही एलबीडब्ल्यू घेतला जाऊ शकतो. पंतने मोमिनुलचे लक्ष विचलित करण्यासाठी असे म्हटले असले, तरी हा डावखुरा फलंदाज विकेटवर टिकून राहिला आणि भारताविरुद्ध प्रथमच कसोटी शतक झळकावले.
दरम्यान बांगलादेशने आपला सलामीवीर झाकीर हसनला २६ धावांवर गमावल्यानंतर मोमिनुल हक क्रीझवर आला. यानंतर मोमिनुलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कमालीचा संयम दाखवला. त्याने विशेषतः अश्विनचा उत्कृष्ट शैलीत सामना केला. चेन्नई कसोटीत मोमिनुलला अश्विनचा खूप त्रास होत होता, पण कानपूरमध्ये परिस्थिती वेगळी दिसत होती. मोमिनुलने आपल्या अर्धशतकासाठी 110 चेंडू घेतले आणि पुढच्या 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मोमिनुलने आपल्या खेळीत एक षटकार आणि 16 चौकार लगावले.
मोमिनुल हक भाग्यवान ठरला
मोमिनुल हकने शतक झळकावले, पण या काळात नशिबानेही साथ दिली. मोमिनुल 93 धावांवर खेळत असताना ऋषभ पंतने अश्विनच्या चेंडूवर त्याचा झेल सोडला. यानंतर 95 धावांवर असताना सिराजच्या चेंडूवर स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला. मात्र, स्लिपमधील हा झेल खूपच कठीण होता.
मोमिनुल हकचे हे शतकही खास आहे. कारण गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच कानपूरमध्ये परदेशी फलंदाजाने शतक झळकावले आहे. यापूर्वी 2004 मध्ये कानपूरमध्ये अँड्र्यू हॉलने कसोटी शतक झळकावले होते. गेल्या 40 वर्षात कानपूरमध्ये केवळ दोनच फलंदाजांनी कसोटी शतक झळकावले आहे, ज्यामध्ये मोमिनुल हकचेही नाव आहे.