मुंबई: भारतीय क्रिकेट संघासमोरील कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून ०-३ असा लाजिरवाणा पराभव झाल्याने संघाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे त्यांना 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सध्याच्या परिस्थितीत टीम इंडियाला या मालिकेत दमदार कामगिरी करणं खूप कठीण वाटतंय आणि एका वाईट बातमीनं त्याच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची उरलेली शक्यताही संपुष्टात येताना दिसत आहे. शमी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि यामुळे तो पुढील दोन रणजी सामन्यांमधून बाहेर पडला आहे.
टीम इंडियाला पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना व्हायचे आहे, जिथे 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. याआधीही टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे गेल्या एक वर्षापासून मैदानाबाहेर असलेला शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर तो तंदुरुस्त होताना दिसत होता, पण नंतर गुडघ्याला आलेल्या सूजने अडथळे निर्माण केले आणि आता त्याच्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. 6 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात तो पुनरागमन करेल आणि बंगालसाठी किमान दोन सामने खेळून फिटनेस सिद्ध करेल, असे मानले जात होते, परंतु आता ही आशाही संपुष्टात आली आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांनी संघाच्या पुढील दोन रणजी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. परंतु, शमीला त्यात स्थान मिळाले नाही. 13 नोव्हेंबरपासून बंगालला प्रथम कर्नाटक आणि नंतर मध्य प्रदेशचा सामना करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमवर गोलंदाजीचा सराव करताना दिसणारा शमी या दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. या दोन सामन्यांतून शमी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती पण आता त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा गेल्या महिन्यातच झाली होती आणि त्यात शमीला स्थान मिळाले नव्हते. मात्र, असे असले तरी, शमीने या दोन रणजी सामन्यांत खेळून आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यास मालिकेच्या मध्यभागी त्याला ऑस्ट्रेलियात पाठवले जाऊ शकते, ज्यामुळे टीम इंडियाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा होती. आता ती आशाही जवळपास संपली आहे. विश्रांतीपूर्वी रणजी ट्रॉफी हंगामात शमीचे हे शेवटचे दोन सामने होते, परंतु आता तेही त्याच्या हातातून निसटले आहेत.