मुंबई: T20 विश्वचषक 2024 जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, हा स्टार गोलंदाज बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्यासाठी आयपीएल 2024 मध्येही खेळणे कठीण आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज, नुकताच टाचांच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. आता बातमी आली आहे की, तो बांगलादेशविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दोन कसोटी आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “शमीवर शस्त्रक्रिया झाली आहे, तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.”
केएल राहुल आयपीएलमध्ये परत येऊ शकतो
जय शाह हे भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर जखमी झालेल्या केएल राहुलबद्दल म्हणाले की, यष्टीरक्षक फलंदाजाला इंजेक्शनची गरज आहे, त्याने पुनर्वसन सुरू केले आहे आणि तो एनसीएमध्ये आहे. दुखापतीमुळे राहुल इंग्लंड मालिकेतील शेवटच्या चार कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर तो आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळेल, अशी अपेक्षा आहे.