मुंबई: इंग्लंडविरुद्ध 22 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे 14 महिन्यांनंतर पुनरागमन झाले आहे.
शमी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यापासून भारतीय संघाबाहेर आहे. या स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला. दरम्यान, वेगवान गोलंदाज बॉर्डर -गावस्कर ट्रॉफीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची बातमी होती. मात्र, फिटनेसच्या कारणास्तव हे शक्य झाले नाही.
आता शमीला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. 34 वर्षीय गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघात परतला आहे. अशा स्थितीत निवड समितीच्या नजरा त्याच्या कामगिरीवर आणि फॉर्मवर असतील. टी-20 मालिकेव्यतिरिक्त भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे, ज्यासाठी बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही.
सूर्यकुमार यादव इंग्लंडविरुद्ध संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर अक्षर पटेल उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. याशिवाय दोन यष्टीरक्षक फलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुतांश खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे.
ध्रुव जुरेल हा जितेश शर्माची जागा घेणार आहे. रमणदीप सिंगच्या जागी स्टार अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या युवा फलंदाजाने अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार कामगिरी केली होती. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो संघाचा भाग होऊ शकला नाही. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा देखील टी-20 मालिकेत खेळताना दिसणार आहेत. हे दोन्ही गोलंदाज बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवम दुबे आणि रियान पराग या संघाचा भाग होऊ शकले नाहीत.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी , वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).