दिल्ली पोलिसांचे ट्वीट चर्चेत
यंदा देशात वर्ल्डकपचा सोहळा रंगला आहे. अशातच टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करत आहे. वर्ल्डकप २०२३ मध्ये खेळवण्यात आलेल्या सर्वच्या सर्व सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलच्या सामन्यातही टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. अशातच ‘मोहम्मद शामीला अटक करू नका’, अशी विनंती दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करुन केली आहे. मोहम्मद शामीनं सामन्यात केलेल्या धडाकेबाज कामगिरीबाबत दिल्ली पोलिसांनी हे गंमतीशीर ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, “मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो की, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शामीला अटक करणार नाही.”
मुंबई पोलिसांचे ट्वीटला गंमतीशीर उत्तर
मुंबई पोलिसांनीही एक गंमतीशीर ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मने चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही.” शामीने उत्कृष्ट खेळी करत न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी धुवाधार फलंदाजी करत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले. पण शामी किवी संघावर तुटून पडला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये विल्यमसनची विकेट घेतली. यानंतर मात्र शामीच्या अंगात जणू वादळच संचारलं होतं. एक एक करून चक्क सात विकेट्स पटकावल्या. किवी फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.