दुबई: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने या खेळाडूला 24 कोटी 75 लाख रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले आहे. कोलकाता व्यतिरिक्त गुजरात टायटन्सनेही या खेळाडूसाठी 24.50 कोटी रुपयांची बोली लावली होती. आज झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते, परंतु स्टार्कने अल्पावधीतच कमिन्सचा विक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गेल्या 8 वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळला नव्हता. यावेळी त्याने आयपीएलमध्ये 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत नाव नोंदवले होते. आयपीएल 2024 च्या लिलावात जेव्हा त्याचे नाव आले, तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने प्रथम त्याच्या नावावर बोली लावली. दिल्लीसोबतच मुंबई इंडियन्सनेही स्टार्कसाठी खूप बोली लावली, पण त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये मिचेल स्टार्कसाठी खरी लढाई सुरू झाली. कोलकाता आणि गुजरात या दोन्ही संघांकडे 31 कोटींहून अधिक रक्कम होती, त्यामुळे दोघांनीही 20 कोटींपेक्षा जास्त नॉन-स्टॉप बोली लावली.
कमिन्सचा विक्रम काही मिनिटांत मोडला
पॅट कमिन्सचा 20.75 कोटींचा विक्रम मोडीत काढत मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपये देऊन अखेर आपल्या संघात समाविष्ट केले आहे. मिचेल स्टार्कने शेवटची आयपीएल 2015 मध्ये खेळली होती. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान स्विंग गोलंदाजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 27 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 20.38 च्या सरासरीने आणि 7.17 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 34 बळी घेतले आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 4 बळी घेणे. आता मिशेल स्टार्क आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी कशी गोलंदाजी करू शकतो हे पाहायचे आहे.