नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मयंक अग्रवालला अचानक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. टीम इंडियातून बाहेर असलेल्या या खेळाडूला रणजी ट्रॉफी सामन्यानंतर फ्लाइटमध्ये चढताना अस्वस्थ वाटत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तोंड आणि घशात दुखण्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.
टीम इंडियाचा फलंदाज आणि कर्नाटक क्रिकेट संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल यांच्याबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. रणजी ट्रॉफी सामन्यानंतर ते त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून परतण्यासाठी विमानात चढत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. प्रवासादरम्यान त्याच्या तोंडात आणि घशात अस्वस्थता जाणवत असल्याच्या तक्रारीनंतर, त्याला तात्काळ विमानातून खाली उतरवण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या चिंतेचे कारण नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कर्नाटक संघाचा कर्णधार असलेला हा खेळाडू 26 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान आगरतळा येथे त्रिपुरा आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात खेळला होता. मंगळवार, 30 जानेवारी रोजी सामना आटोपल्यानंतर कर्नाटक संघ सुरतला जाण्यासाठी विमानात बसला. मिळालेल्या माहितीनुसार, मयंक अग्रवाल याला आगरतळा येथील आयएलएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.