पुणे प्राईम न्यूज: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला. विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने सर्वोच्च धावसंख्या उभा केली आहे. श्रीलंकेविरुद्ध आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावली. विश्वचषकाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे.
श्रीलंकेच्या अननुभवी गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. क्विंटन डी कॉक (100), रॅसी व्हॅन डर डुसेन (108) आणि एडन एडन मार्करम (106) यांच्या शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 5 गडी गमावून 428 धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासातील ही सर्वाधिक सांघिक धावसंख्या आहे. विश्वचषकात प्रथमच एका संघातील तीन फलंदाजांनी शतके झळकावली आहेत.
एडन मार्करमचे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक
एडन मार्करमने एकदिवसीय विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावून इतिहास रचला. त्याने अवघ्या 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या केविन ओब्रायनच्या नावावर होता, ज्याने 50 चेंडूत शतक झळकावले होते. 2011 च्या विश्वचषकात आयर्लंडच्या केविनने इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूत शतक झळकावले होते.
तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेंबा बावुमा केवळ आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर डुसेन आणि डी कॉकने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली.
डी कॉकने 84 चेंडूत 100 धावा केल्या. यामध्ये त्याने 12 चौकार आणि तीन षटकार मारले. तर डुसेनने 110 चेंडूत 108 धावांची खेळी केली. डुसेनने 13 चौकार आणि 2 षटकार ठोकले. यानंतर मार्करामने सर्वात वेगवान शतक झळकावले. हेनरिक क्लासेनने 20 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. अखेरीस डेव्हिड मिलर 21 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 आणि मार्को जॅनसेन सात चेंडूत 12 धावा काढून नाबाद माघारी परतले.
हेही वाचा:
शक्ती कपूरने केला धक्कादायक खुलासा, म्हणाले, मिथुनने केली होती माझ्यावर रॅगिंग
मोठी बातमी! पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलने केली युद्धाची घोषणा