पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारी नेमबाज मनू भाकरने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत देशासाठी कांस्यपदक जिंकल्यानंतर मनू भाकरने आता मिश्र सांघिक स्पर्धेतही पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिश्र स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले, आता या दोघांची कांस्यपदकाच्या लढतीत दक्षिण कोरियाच्या नेमबाजांशी लढत होईल. मनू भाकर आणि सरबजोत यांचा ब्रॉन्झ पदक सामना मंगळवारी दुपारी 1 वाजता होणार आहे.
दरम्यान रिदम सांगवान आणि अर्जुन चीमा हे 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेतही भाग घेत होते. दोन्ही खेळाडूंची सुरुवात चांगली झाली. पण नंतर त्यांची लय बिघडली आणि त्यांनी एकूण 576-14 गुणांसह 10वे स्थान पटकावले. दुसरीकडे मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 580-2 गुण मिळवले.
रमिता जिंदाल यांनी निराशा केली
भारताची आणखी एक नेमबाज रमिता जिंदालने निराशा केली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत 7व्या स्थानावर राहिली. 20 वर्षीय रमिताने 8 नेमबाजांच्या अंतिम फेरीत 145.3 गुण मिळवले. 10 शॉट्सनंतर ती 7व्या स्थानावर राहिली. रविवारी रमिता पात्रतामध्ये पाचव्या स्थानावर राहिली. हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती रमिता हिने जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेत्या मेहुली घोष आणि तिलोत्तमा सेन यांना देशांतर्गत चाचण्यांमध्ये पराभूत करून पॅरिसचे तिकीट बुक केले होते.