हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथील १४ वर्षे वयोगट विद्यार्थ्यांनी ”सेपक टकरा” या खेळात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला तर १७ वर्षीय वयोगट विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली असल्याची माहिती महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत भोसले यांनी दिली.
पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ”सेपक टकरा” या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राजगुरुनगर (ता. खेड) येथील खेड तालुका क्रीडा संकुल येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथील १४ वर्षे वयोगट मुलांच्या गटाचा ”सेपक टकरा” या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला तर १७ वर्षे वयोगट मुलांच्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवला.
दरम्यान, विद्यालयाच्या वरील दोन्ही संघांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडली आहे. महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत भोसले यांनी वरील दोन्ही संघाचे कौतुक केले. सदर मुलांना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक संगीता शिर्के व साहेबराव कुंभारकर यांनी केले.