पुणे : महाराष्ट्र चॅम्पियन किताब पटकावलेल्या मल्लाचे सराव करताना लाल मातीतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या ३१ वर्षाी मृत्यू झाल्याने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वप्निल पाडाळे (वय 31) असे या पैलवानाचे नाव आहे. हा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातून घडलेला मल्ल होता. आज सकाळी ७.३० वाजता पुण्यातील मारुंजी इथल्या कुस्ती तालमीत ही दुर्दैवी घटना घडली. स्वप्नील हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना स्वप्निल अचानक कोसळला तो पुन्हा उठलाच नाही.
स्वप्निल अचानक खाली कोसळल्याचं पाहाताच तालमीतील इतर जणांनी त्याला उचलले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याआधीच स्वप्निलचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रशिक्षणासाठी त्याने एन.आय. एस. पतियाळा येथून विशेष अभ्यासही पूर्ण केला होता. स्वप्निलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.