लखनऊ: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकानंतर क्रुणाल पंड्याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने ८ गडी गमावून १९९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टोने झंझावाती सुरुवात केल. पण 21 वर्षीय नवोदित गोलंदाजाने लागोपाठ विकेट घेत सामन्याचा रंगच बदलून टाकला. 5 विकेट्स गमावल्यानंतर पंजाबचा संघ 20 षटकांत केवळ 178 धावांपर्यंत मजल मारू शकला. लखनऊने हा सामना 21 धावांनी जिंकला.
मयंक यादव पदार्पणात चमकला
लखनऊकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक यादवने आपल्या वेगवान चेंडूने सर्वांना थक्क केले. 21 वर्षीय या गोलंदाजाने वेगवान फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला 11.4 षटकांत बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर त्याने प्रभसिमरन सिंगचे झंझावात रोखला. त्यानंतर जितेश शर्मासारख्या आक्रमक फलंदाजाची विकेट घेत लखनला सामन्यात परत आणले. त्याने 17 धावांत 3 बळी घेत सामन्याचे चित्र बदलून टाकले.
धवन आणि बेअरस्टोची झंझावाती भागीदारी
लखनऊ विरुद्ध 200 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्जसाठी शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी शानदार सुरुवात केली. या दोघांनी मिळून अवघ्या 62 चेंडूत संघासाठी 100 धावांची भागीदारी केली. पंजाबने 102 धावांवर पहिली विकेट गमावली आणि त्यानंतर संघाला पुनरागमन करता आले नाही. शिखर धवनने 50 चेंडूत 70 धावांची खेळी खेळली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.