सोलापूर : ‘मेफेनटरमाईन’ हे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विकता न येणारे औषध, पैलवानांना थेट विकल्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने माळशिरसच्या तीन औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे औषध पैलवानांनी खरेदी केल्याने कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ५ डिसेंबर रोजी माळशिरस येथील तीन मेडिकल्सची तपासणी केली होती. यात तपासणीमध्ये अवैध पद्धतीने ‘मेफेनटरमाईन’ या औषधाची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने या तीनही औषध विक्रेत्यांना खुलासा सादर करण्याची नोटीस पाठविली होती.
या नोटिशीला उत्तर देताना विक्रेत्यांनी खुलासा सादर केला होता. परंतु तो असमाधानकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन जाहीर केले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने या तीनही औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचलताना त्याचे औषध विक्री परवाने रद्द केले.
औषध विक्रेत्यांनी हे औषध तालमीत सराव करणाऱ्या पैलवानांना विकले असल्याचे आपल्या खुलाशात म्हटले होते. मेफेनटरमाईन या औषधाची विक्री डॉक्टरांची चिट्ठी व बिलाशिवाय विक्री करता येत नाही. डॉक्टरांना हे औषध केवळ ३०० रुपयांच्या आसपास तर खुल्या बाजारपेठेत सुमारे १५०० रुपयांच्या आसापास उपलब्ध असते. परंतु हे औषध केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेता येते. त्यामुळेच या तीनही औषध विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे.
महाराष्ट्र केसरी तोंडावर असल्याने कुस्ती क्षेत्रात खळबळ
महाराष्ट्रातील मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यातच माळशिरस येथील औषध विक्रेत्याने मेफेनटरमाईन हे औषध तालमीत सराव करणाऱ्या पैलवानांना विकले असल्याचे आपल्या खुलाशात म्हटले आहे. त्यामुळे नक्की कोणत्या पैलवानांनी हे औषध घेतले आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करता यावी, यासाठीच अनेक पैलवान धडपडत असतात. मात्र अशा प्रकारे औषधे घेऊन आपला ‘परफॉर्मरन्स’ पैलवान दाखवणार का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.