पॅरिस: युवा शटलर लक्ष्य सेनने आपल्या जबरदस्त कामगिरीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधू आणि सात्विक साईराज रेड्डी-चिराग शेट्टी यांच्या पराभवामुळे निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीच्या बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. यासह, ऑलिम्पिक इतिहासात उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. लक्ष्यने आपल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. तैवानच्या शटलरला 19-21, 21-15 आणि 21-12 असे पराभूत केले आणि उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले.
एक दिवसापूर्वीच भारताला बॅडमिंटन कोर्टवर दुहेरी धक्का बसला होता. देशासाठी पदकाची मोठी आशा असलेल्या स्टार शटलर पीव्ही सिंधूचे सलग तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकणे हुकले. तिला प्री-क्वार्टर फायनलमध्येच पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग या सुपरस्टार जोडीलाही हृदयद्रावक पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. अशा स्थितीत, बॅडमिंटनमध्ये भारताची शेवटची आशा लक्ष्य होती, ज्याने प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या वरिष्ठ एचएस प्रणॉयचा पराभव केला.