SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ च्या चषकावर तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. कोलकात्याने हैदराबादचा ८ विकेट आणि ५७ धावांनी पराभव केला. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला ११४ धावांची गरज होती. हैदराबादने दिलेले माफक आव्हान कोलकात्याने २ विकेट आणि ६३ चेंडूमध्ये सहज पार केले. कोलकात्याने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले असून याआधी २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकात्याने चषकावर नाव कोरले होते.
हैदराबादने दिलेल्या ११४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सुनिल नारायण फक्त ६ धावा काढून बाद झाला. पॅट कमिन्स याने त्याला दुसऱ्याच षटकात तंबूत धाडले. त्यानंतर गुरबाज आणि वेंकटेश अय्यर यांनी हैदराबादची गोलंदाजी फोडली. दोघांनी ४५ चेंडूमध्ये ९१ धावा काढल्या. गुरबाजने ३२ चेंडूमध्ये ३९ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने २ षटकार आणि ५ चौकार मारले. शाहबाद अहमदने गुरबाजला बाद केले, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अखेरीस श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
वेंकटेश अय्यर याने पुन्हा एकदा शानदार अर्धशतक मारले. वेंकटेश अय्यरने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. त्याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अय्यरने २६ चेंडूमध्ये नाबाद ५२ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने ३ षटकार आणि ४ चौकार ठोकले. श्रेयस अय्यर याने नाबाद ६ धावांची खेळी केली. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
कोलकात्याने याआधी २०१२ आणि २०१४ साली आयपीएल जिंकण्याची कामगिरी बजावली होती. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलची किंग ठरली आहे. कोलकात्यानं चेन्नईतल्या आयपीएल फायनलनवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव ११३ धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली.