पुणे : भारताचा अनुभवी फलंदाज माजी कर्णधार विराट कोहलीचा तब्बल १०२० दिवस म्हणजेच जवळपास तीन वर्षांपासूनचा शतकदुष्काळ अखेरीस गुरुवारी संपुष्टात आला आहे. तर भुवनेश्वर कुमारचा भेदक मारा आणि विराट कोहलीचे प्रतिक्षित ७१ व्या शतकाच्या जोरावर भारताने आशिया कपमधील आपल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला. भारताने आशिया कपचा शेवट गोड केला.
भुवनेश्वर कुमारने ४ षटकात अवघ्या ४ धावा देत ५ विकेट घेतल्या. तर प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १२२ धावांची तुफानी खेळी केली. त्याला कर्णधार केएल राहुलने ६२ धावा करून चांगली साथ दिली. अफगाणिस्तानकडून इब्राहीम झादरानने ६४ धावंची झुंजार खेळी करत अफगाणिस्तानला शतक १११ पार करून दिले.
आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धच्या ‘अव्वल चार’ फेरीतील सामन्यात कोहलीची बॅट तळपल्यावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे आणि आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक साकारले.
A stunning five-wicket haul for Bhuvneshwar Kumar ????#INDvAFG | #AsiaCup2022 | Scorecard: https://t.co/z8iw8dn85Q pic.twitter.com/JUwtuQriMg
— ICC (@ICC) September 8, 2022
या खेळीदरम्यान कोहली पूर्ण लयीत दिसला. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याला क्षेत्ररक्षण भेदून चौकार लगावण्यात यश आले. रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब यांसारख्या गुणवत्तापूर्ण फिरकीपटूंविरुद्ध क्रीजबाहेर येऊन त्याने फटकेबाजी केली. तसेच त्याच्यासाठी दुर्मिळ असे स्वीपचे फटकेही त्याने मारले. अखेरच्या चार षटकांत त्याने फझलहक फरुकी आणि फरीद अहमद या डावखुऱ्या फिरकीपटूंविरुद्ध सहा चौकार आणि तीन षटकरांची आतषबाजी केली.
कव्हर ड्राइव्ह, पूल आणि फ्लिक यांसारख्या फटक्यांचा नजराणा पेश करताना कोहलीने ६१ चेंडूंत १२ चौकार आणि सहा षटकारांच्या साहाय्याने नाबाद १२२ धावांची खेळी केली. नोव्हेंबर, २०१९ पासून (बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत १३६ धावा) हे त्याचे पहिले शतक ठरले. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने या औपचारिक सामन्यात अफगाणिस्तान संघाचा १०१ धावांनी धुव्वा उडवला. भारताचे २१२ धावांचे अवाढव्य आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या अफगाणिस्ताचा डाव पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. भुवनेश्वर कुमारने ४ षटकात ४ धावा देत ५ विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंगने १ विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक भारत : २० षटकांत २ बाद २१२ (विराट कोहली नाबाद १२२, केएल राहुल ६२; फरीद अहमद २/५७)
विजयी वि. अफगाणिस्तान : २० षटकांत ८ बाद १११ (इब्राहिम झादरान नाबाद ६४; भुवनेश्वर कुमार ५/४, दीपक हुडा १/३)
सामनावीर : विराट कोहली