पुणे प्राईम न्यूज: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला आहे. विराट कोहली आणि केएल राहुल भारताच्या विजयाचे हिरो ठरले. वास्तविक, 200 धावांचा बचाव करताना भारताने अवघ्या दोन धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर शरणागती पत्करेल असे वाटत होते, पण कोहली आणि राहुलने आपल्या शानदार फलंदाजीने सामन्याचे चित्र फिरवले. कोहलीने 116 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 85 धावांची शानदार खेळी केली. तर केएल राहुल ९७ धावांवर नाबाद परतला. राहुलने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्यासह हार्दिक पंड्या 11 धावा करून नाबाद राहिला.
तत्पूर्वी ऑस्ट्रिल्याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर केवळ 199 धावा करू शकला. भारतीय फिरकीपटू कांगारू फलंदाजांसाठी एक कोडेच ठरले. भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज रवींद्र जडेजा ठरला. जडेजाने 10 षटकात 2 मेडन्ससह केवळ 28 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. भारताची गोलंदाजी एवढी भेदक होती की, ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची मधली फळी पत्त्यासारखी कोसळली.
मिडल ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मिचेल मार्श खातेही न उघडता बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला विराट कोहलीद्वारा झेलबाद केले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. मात्र, चेंडू जुना झाल्यानंतर दोघांनाही धावा काढणे कठीण झाले.