नवी दिल्ली: विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जपानच्या युई सुसाकीचा पराभव करून संपूर्ण जगाला चकित केले आहे. युई सुसाकीचा विक्रम पाहता प्री-क्वार्टर फायनलमधील विनेशच्या विजयावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. सुसाकीला पराभूत केल्यानंतर, विनेशला इतका आनंद झाला की, ती कुस्तीच्या मॅटवर आनंदाने उड्या मारू लागली, तर पदकासाठी तिला अजून एक सामना जिंकायचा आहे. 2010 पासून सुसाकीने केवळ 3 लढती गमावल्या आहेत, यावरून सुसाकीला पराभूत करणे, किती कठीण होते याचा अंदाज लावला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगभरातील कुस्तीपटूंना पराभूत करणारी युई सुसाकी कोण आहे? हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
सुसाकीचे रेकॉर्ड आश्चर्यकारक
युई सुसाकी हे कुस्ती विश्वातील एक मोठे नाव आहे. प्रतिस्पर्ध्याचे पैलवान फक्त तिच्या नावाने घाबरतात. तिच्या विजयाचे आकडे विरोधकांना घाबरवण्यासाठी पुरेसे आहेत. सुसाकी टोकियो ऑलिम्पिकची चॅम्पियन राहिली असून तिने अंतिम फेरीत एकतर्फी विजय मिळवला होता. या सामन्यात तिने एकही गुण दिला नाही, तर स्वतः 10 गुण मिळवले. सामना 10-0 असा जिंकला. हा फक्त एक ट्रेलर आहे, तिच्या करिअरच्या आकडेवारीवर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही.
विनेश फोगटच्या आधी एकही बिगर जपानी कुस्तीपटू तिला पराभूत करू शकला नाही. यापूर्वी तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्व 82 बाउट्स जिंकल्या आहेत. तिने हे सामने तर जिंकलेच, पण विरोधी कुस्तीपटूचाही पूर्ण पराभव केला. बहुतांश सामन्यांमध्ये तिने एकतर्फी विजय मिळाला. गेल्या 10 वर्षांत, सुसाकीने 733 गुण मिळवले, तर विरोधी कुस्तीपटूंना केवळ 34 गुण मिळविण्याची संधी दिली गेली. यावरून सुसाकीचे कुस्तीमध्ये किती वर्चस्व आहे, याचा अंदाज लावता येतो.
युई सुसाकीने 2010 पासून 14 वर्षांत केवळ 3 सामने गमावले आहेत. याशिवाय ती चार वेळा वर्ल्ड चॅम्पियनही राहिली आहे. 2017 मध्ये तिने जागतिक चॅम्पियनशिपच्या 48 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर तिने 2018, 2022 आणि 2023 मध्ये 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. सुसाकी 2017 आणि 2024 मध्ये आशियाई चॅम्पियनही राहिली आहे.