मुंबई: आणखी एका भारतीय नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला आहे. मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नील कुसाळेचा हा विजय ऐतिहासिक आहे. कारण या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. कोल्हापूरच्या या 29 वर्षीय नेमबाजाचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. या खेळाडूने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. हा खेळाडू 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि जेव्हा त्याला पॅरिसमध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने इतिहास रचला.
कोण आहे स्वप्नील कुसाळे-
नेमबाज स्वप्नील कुसाळे कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहे. त्याचा जन्म 6 ऑगस्ट 1995 मध्ये झाला आहे. स्वप्नीलने पॅरिसमध्ये आपल्या कर्तुत्वाची झलक दाखवली आहे. स्वप्नील याचा शूटिंग खेळण्यापासून ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने आपल्या बारावीच्या परिक्षेकडे दुर्लक्ष केले. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलचा महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत प्रवेश घेतला.
त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला त्याने नेमबाजीतील स्किल विकसित करण्यासाठी पुण्यात येण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. स्वप्नील कुसाळे हा 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. स्वप्नील हा महेंद्रसिंग धोनीच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे.