मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल राजकोट कसोटीमध्ये खेळणार नाही. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचे खेळणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, आता केएल राहुल खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रवींद्र जडेजा राजकोटमध्ये खेळणार हे नक्की!
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळे तो राजकोट कसोटीत खेळू शकणार नाही. पण टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे की, रवींद्र जडेजा फिट घोषित झाला आहे. म्हणजेच तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने हैदराबाद कसोटीत टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला. त्यानंतर विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने ब्रिटिशांचा १०६ धावांनी पराभव केला. त्यामुळे तिसरी कसोटी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
केएल राहुलच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी का?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिकल तिसऱ्या कसोटीत केएल राहुलच्या जागी खेळणार आहे. वास्तविक, देवदत्त पडिकलचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये अलीकडचा फॉर्म उत्कृष्ट आहे. त्यामुळे देवदत्त पडिकल राजकोट कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.