न्यूयॉर्क: भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल माजी फिरकीपटू हरभजन सिंगने पाकिस्तानच्या कामरान अकमलला झापले आहे. समाज माध्यमांवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर कामरानने माफी मागितली आहे. भारत आणि पाकिस्तान संघातील लढतीचे विश्लेषण करताना कामरानने स्थानिक वृत्तवाहिनीवर अर्शदीपच्या शीख धर्माची खिल्ली उडवली होती. काहीही होऊ शकते. बघा, अर्शदीप सिंगला अखेरचे षटक टाकायचे आहे. तो चांगल्या लयमध्ये दिसत नाही आणि रात्रीचे १२ वाजले आहेत.
हरभजनने या घटनेचा व्हिडीओ एक्स या समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. यामध्ये अर्शदीपवर बोलताना कामरानसोबत बसलेले इतरउपस्थित मान्यवर हसताना दिसत आहेत. यावरून हरभजनने कामरानला धारेवर धरले. तुम्ही घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्या. आक्रमणकर्त्यांनी अपहरण केले, तेव्हा आम्ही शिखांनी तुमच्या माता-भगिनींना वाचवले, वेळ १२ ची होती. तुम्हा लोकांना लाज वाटली पाहिजे… थोडी कृतज्ञता दाखवा, असे सुनावले आहे.
आपल्या कृत्याची उपरती झाल्यानंतर हरभजनला टॅग करत कामरानने आपल्या विधानावरून खेद व्यक्त केला. हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अपमानास्पद होते. जगभरातील शीख समुदायांबद्दल खूप आदर आहे आणि माझा कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला खरोखर माफ करा, असे देखील म्हटले आहे.