लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील कै.भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. या स्पर्धा व्यायाम मंडळातर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात भारत पेट्रोलियम तर महिला गटात शिवशक्ती संघाने जेतेपद पटकावले. जिल्हास्तरीय स्पर्धेत टेबल लॅंन्ड व्यापारी असोसिएशनच्या संघाने जेतेपद पटकावले. पुरुष गटात भारत पेट्रोलियमचा निलेश शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तर महिला गटात शिवशक्तीची पुजा यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तर जिल्हास्तरीय स्पर्धेत दिपक पाटील, अलंकार राजपुरे व नयन पठान सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले.
पाचगणी येथील कै.भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर संपन्न झालेल्या जिल्हा व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बक्षीस वितरण समारंभ वाई-खंडाळा- महाबळेश्वर मतदार संघाचे जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, उपाध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, कोषाध्यक्ष विठ्ठलशेठ गोळे, माजी नगराध्यक्ष साहेबराव बिरामणे,डी.एम.बावळेकर, शेखर कासुर्डे, माजी सभापती संजय गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामणे, गणेश गोळे,माजी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे, माजी सभापती राजेंद्र भिलारे, नितीन दादा भिलारे, विनोद कंळबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मकरंद पाटील म्हणाले, कब्बडी व कुस्ती लाल मातीतील महाराष्ट्राचा खेळ आहे. हे खेळ वाढले पाहिजेत या भावनेतून कै.भाऊसाहेब भिलारे क्रीडांगणावर असणारी जुनी इमारत पाडून या ठिकाणी आतंरराष्ट्रीय क्रीडांगण उभारण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियमने बॅंक ऑफ बडोदा संघाचा प्रतिकार २९-२७ असा मोडून काढत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारत पेट्रोलियम संघाने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या काही मिनिटांतच बॅंक ऑफ बडोदा संघाला लोण देत १०-०६ अशी आघाडी घेतली. पण, बॅंक ऑफ बडोदाने देखील त्यानंतर जशास तसे उत्तर देत हा लोण फेडत ही आघाडी ११-१२ अशी कमी केली. मध्यंतराला १४-१० अशी आघाडी होती.
दुसऱ्या डावात बॅंक ऑफ बडोदाने आपला खेळ अधिक गतिमान करीत स्कोर २७-२७ बरोबरी केली. दुसऱ्या डावात भारत पेट्रोलियमने दोन गुण मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. महिलांच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात धारदार चढाया व भक्कम पकडी करीत
शिवशक्ती महिला संघाने राजमाता पुणे संघाचा ३१-३० असा पराभव करत विजय मिळवला.
दरम्यान, जिल्हास्तरीय ६५ किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात टेबल लॅंन्ड व्यापारी असोसिएशनच्या संघाने श्रीराम कब्बडी संघ भिलार या संघावर मात करत विजेतेपद पटकावले.
तर ५० किलो वजनी गटात गोडवलीच्या तपनेश्वर सेवा मंडळाने दोन गुणांनी विजय मिळवला.३५ किलो वजनी गटात दांडेघरच्या केदारेश्वर सेवा मंडळाने तीन गुणांनी विजय मिळवला.