मुंबई: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा 1-0 असा पराभव केला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला जुगराज सिंग, ज्याने चौथ्या क्वार्टरच्या 51व्या मिनिटाला शानदार गोल करत टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली. चीनने अंतिम सामन्यात टीम इंडियाला कडवी झुंज दिली, पण जुगराजचा गोल त्यांना महागात पडला. भारतीय हॉकी संघ जेव्हाही जिंकतो, तेव्हा कर्णधार हरमनप्रीत सिंगचे नाव सर्रास समोर येते. मात्र, यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवरील एका छोट्या गावात जन्मलेल्या जुगराज सिंगने बाजी मारली. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो असलेला जुगराज कोण आहे आणि त्याची हॉकी संघापर्यंत पोहोचण्याची कहाणी काय आहे, हे जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.
जुगराज भारत-पाकिस्तान सीमेवर झाला लहानाचा मोठा
जुगराज सिंह यांचा जन्म पंजाबमधील अटारी येथे झाला. अटारी हे भारत-पाकिस्तान सीमेवर आहे. येथे एक वेळ अशी होती की येथे वारंवार गोळीबार व्हायचा. पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराने येथील लोकांना इतका त्रास दिला होता की, एक वेळ भारतीय लष्कराने जुगराजचे गाव रिकामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर परिस्थिती सुधारली असली तरी जुगराज आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जुगराजने भारत-पाकिस्तान सीमेवर पाण्याच्या बाटल्या विकल्या. त्याचे वडील सीमेवर कुली म्हणून काम करायचे. जुगराजने आपल्या कुटुंबाची गरिबी संपवण्यासाठी हॉकीची निवड केली आणि कोणत्याही मार्गदर्शकाशिवाय त्याने या खेळात आपले नाव कमावले.
नौदलात केला प्रवेश
शमशेर सिंग आणि चतारा सिंग हे जुगराज सिंग याचे आदर्श आहेत. हे दोन्ही खेळाडू त्याच्या गावातील होते. हे पाहून जुगराजने जालंधर येथील हॉकी अकादमीत प्रवेश घेतला आणि २०११ मध्ये त्याची पीएनबी संघात निवड झाली. त्याला तिथे फक्त 3500 रुपये स्टायपेंड मिळत असे. पण 2016 मध्ये त्याचे आयुष्य बदलले. जुगराला 2016 मध्ये भारतीय नौदलाच्या संघात प्रवेश मिळाला आणि त्याला ऑफिसर बनवण्यात आले. जुगराजसाठी ही नोकरी मोलाची होती. कारण त्याचा पगार 3500 वरून 35000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आज देश जुगराजला वंदन करत आहे. आधी त्याने टीम इंडियाला ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळवून दिले आणि आता त्याने देशाला आशिया चॅम्पियन बनवले आहे.