मुंबई: महिला टी-20 विश्वचषकाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये होत आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील प्रवास ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणार आहे. टीम इंडियाचा सामना ६ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या वेळी या स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. यात जेमिमाह रॉड्रिग्जचे महत्त्वाचे योगदान होते. T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी तिने त्या सामन्याची कहाणी सांगितली, जेव्हा सर्वजण तिला कोणत्याही किंमतीत पाकिस्तानला हरवायचे आहे, हे सांगत होते. एका चौकीदाराने तर ‘विश्वचषक जिंकला नाही, तरी चालेल पण तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध हरायचे नाही’ असे म्हटले होते.
पाकिस्तान मॅचपूर्वी जेमिमा होती नर्व्हस
कोणत्याही खेळात भारत-पाकिस्तान सामना खूप तणावपूर्ण असतो. त्यामुळे खेळाडू नर्व्हस होतात. 2023 च्या विश्वचषकादरम्यान जेमिमाह रॉड्रिग्जसोबत असेच काहीसे घडले होते. ती या स्पर्धेतही फॉर्मात नव्हती आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सर्वजण तिच्याकडून विजयाची मागणी करत होते. अशा स्थितीत ती खूप घाबरली. तिच्या अस्वस्थतेवर मात करण्यासाठी ती फिरायला गेली.
दुसऱ्या दिवशी ती फलंदाजीला आली, तेव्हा तिने ऐतिहासिक खेळी खेळली. पाकिस्तानने भारतासमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना संघाने सहाव्या षटकातच पहिली विकेट गमावली. यानंतर जेमिमा फलंदाजीला आली आणि 38 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, यावेळी जेमिमाला तिसऱ्या क्रमांकावर नाही तर मधल्या फळीत जबाबदारी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ती कशी कामगिरी करते हे पाहायचे आहे.
जेमिमा तिच्या भूमिकेबद्दल काय म्हणाली?
जेमिमा यूएईमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. तिने संघात मिळालेली ही भूमिका खूपच वेगळी आणि गुंतागुंतीची असल्याचे वर्णन केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणे खूप वेगळे आहे, असे तिचे मत आहे, कारण प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी असते. कधी भागीदारी करावी लागते, तर कधी धावांचा वेग कायम ठेवण्यासाठी मोठे फटके मारावे लागतात. त्यामुळे ती पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक आणि आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे.
बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त
काही दिवसांपूर्वी जेमिमाह रॉड्रिग्ज तिच्या बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त होती. मात्र, ती वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सराव करत होती. ती या स्पर्धेत पूर्णपणे तंदुरुस्त राहील, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघ अद्याप महिला टी-20 विश्वचषक जिंकू शकलेला नाही. गेल्या वेळी भारतीय संघ ट्रॉफीच्या जवळ आला होता आणि स्पर्धेतून बाहेर पडला होता. रोमहर्षक उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताने 5 धावांनी पराभव केला होता. मात्र, यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौरने आजपर्यंतचा सर्वोत्तम संघ असल्याचे सांगत विजयाची आशा व्यक्त केली आहे.