मुंबई: टीम इंडियाने विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. यापूर्वी हैदराबाद कसोटीत इंग्लंडने भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव केला होता. अशाप्रकारे 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी या कसोटीपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह राजकोट कसोटीत सहभागी होणार नाही.
जसप्रीत बुमराहला राजकोट कसोटीत मिळणार विश्रांती!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहला तिसऱ्या टेस्टसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण राजकोट कसोटीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा भाग नसल्याचं समजत आहे.
सध्याच्या भारत-इंग्लंड मालिकेत जसप्रीत बुमराह सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत 2 कसोटी सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने 15 इंग्लिश फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत 6 विकेट्स घेतल्या. यानंतर इंग्लंडच्या विशाखापट्टणम कसोटी डावात 6 फलंदाज बाद झाले. तर दुसऱ्या डावात 3 इंग्लिश फलंदाजांना आपले बळी बनविले. अशाप्रकारे जसप्रीत बुमराहने या कसोटी मालिकेत 15 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहला विशाखापट्टणममध्ये त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.