पुणे : इंडियन प्रिमियर लीगच्या (आय.पी.एल) १६ व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झाले असून ३१ मार्च ते २८ मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर उद्घाटनाचा सामना होणार आहे.
आयपीएल २०२३ चं आयोजन भारतातच होणार एकूण ७४ सामने होणार आहेत. देशभरातील १२ मैदानावर सामने रंगणार आहे. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी १४-१४ सामने खेळणार आहेत. याप्रमाणे १० संघामध्ये ७० सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. २८ मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दोन एप्रिलला होणार आहे. २१ मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. प्रत्येक संघाचे सात सामने घरच्या मैदानावर होणार आहेत, तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होणार आहेत.
दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.
दरम्यान, मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.