GT vs MI अहमदाबाद: आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा सामना आज (दि. २९) शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सशी होणार आहे. गुजरात व मुंबई दोघेही हा सामना जिंकून विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न करतील. गुजरातला आपल्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून ११ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. तिथे मुंबईला चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या सामन्यात चार गडी राखून पराभूत केले होते.
दुसरीकडे मुंबईसाठी दिलासादायक बाब म्हणजे या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार आहे. तो मागील सामन्यात बंदीमुळे खेळू शकला नव्हता. स्पर्धेची आता सुरूवातच झाली आहे. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविना मुंबईचे गोलंदाजी आक्रमण संघर्ष करताना दिसून आले आहे. यादरम्यान पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार हार्दिकच्या अनुपस्थितीत संघाच्या अडचणीत भरच पडली होती. हार्दिक भारतीय क्रिकेटमधील चालू घडीचा एकमेव वेगवान गोलंदाजासह अष्टपैलू खेळाडू आहे. तो चेंडू व बॅट दोन्हीपैकी एकानेही सामन्यावर मोठा प्रभाव पाडू शकतो. त्याचे पुनरागमन म्हणजे कदाचित रॉबिन मिंजला बाकावर बसावे लागू शकते. मिंज आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुध्द चेपॉकवरील कठीण खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसून आला होता.
मुंबई इंडियन्सविरूध्दच्या हायव्होल्टेज सामन्यासाठी गुजरातचा संघ अर्शद खानला बाहेर ठेवू शकतो व त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. वॉशिंग्टन पंजाबविरुद्ध गुजरातच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये सामील नव्हता. त्या सामन्यात संघासाठी साई किशोरने चांगली गोलंदाजी केली होती. वॉशिंग्टनला खेळविण्याचा फायदा हा आहे की, तो पाँवरप्लेमध्ये गोलंदाजी करू शकतो व मधल्या षटकांमध्ये फलंदाजीनेही उपयुक्त योगदान देऊ शकतो. गुजरातला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, तो पंजाब किंग्जविरुद्ध प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता. जिथे गुजरातच्या फलंदाजीचा प्रश्न आहे, तिथे संघ पुन्हा एकदा साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल व जोस बटलरवर अवलंबून असेल.
मुंबईसाठी भारतीय टी-ट्वेन्टी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव व कसोटी तथा एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा सध्या हरवलेला सूर चिंतेचा विषय आहे. हार्दिकच्या पुनरागमनाने संघाच्या फलंदाजीत सखोलपणा येईल. गरज पडल्यास तो नव्या चेंडूने गोलंदाजी आक्रमणाची सुरुवातही करू शकतो. मुंबईसाठी आणखी एक समस्या यष्टिरक्षक फलंदाजाचीही आहे. संघ रेयान रिक्लेटोनवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. कारण रॉबिन मिंजकडे या स्तरावरील क्रिकेटचा जास्त अनुभव नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फिरकीपटूंना मदत असलेल्या खेळपट्टीवर फिरकीपटू विघ्नेश पुथुरने आपल्या प्रतिभेने चांगलेच प्रभावित केले आहे. मात्र, त्याची खरी परीक्षा गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजीसाठी सोप्या असलेल्या खेळपट्टीवर होईल.