मुंबई: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी अनेक मोठे संकेत दिले आहेत. क्रिकबझच्या वृत्तानुसार, मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आयपीएलच्या पुढील हंगामापासून मनोरंजन वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. जय शाह यांनी खुलासा केला की, संपूर्ण स्पर्धेत 84 सामने खेळले जाऊ शकतात. आत्तापर्यंत संपूर्ण हंगामात फायनलसह एकूण 74 सामने खेळले जात होते. यामध्ये पूर्वी 10 संघ 70 लीग सामने खेळायचे. यानंतर 3 प्लेऑफ आणि एक अंतिम सामना खेळला जात आहेत.
आयपीएल संदर्भात अनेक मोठे अपडेट्स
जय शाह यांनी आयपीएलबाबत अनेक मोठे अपडेट्स दिले आहेत. लीगमधील सामन्यांची संख्या वाढवण्याचे संकेत त्यांनी दिले. याबाबत ते म्हणाले की, सध्या काहीही निर्णय झालेला नाही. हे करण्यापूर्वी बोर्ड खेळाडूंच्या वर्कलोडचा तसेच लीग विंडोचाही विचार करेल. त्यानंतरच बीसीसीआय निष्कर्षावर पोहोचेल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. मेगा लिलाव रद्द करून फुटबॉल क्लबप्रमाणे हस्तांतरण पद्धत सुरू करण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. बीसीसीआय सचिवांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे.
जय शाह यांनी खुलासा केला की, ज्या फ्रँचायझींमध्ये चांगले खेळाडू आहेत, ते यावेळी मेगा लिलाव घेण्याच्या बाजूने नाहीत. दुसरीकडे, ज्या फ्रँचायझी आपला संघ मजबूत करण्यात अपयशी ठरल्या आहेत, ते बाजूने आहेत. खेळाच्या विकासासाठी बदलासोबतच विरामही आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे. तथापि, बीसीसीआयसाठी सर्व प्रकारची मते महत्त्वाची आहेत आणि कोणत्याही फ्रेंचायझीवर अन्याय होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सखोल चर्चा केली जाईल.
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम हटवला जाईल का?
आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम हा सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला आहे. अनेक खेळाडूंसह क्रिकेट तज्ज्ञ हा नियम हटवण्याच्या बाजूने आहेत. याचा खेळावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांचे मत आहे. याशिवाय या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंनाही संधी मिळत नाही. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली.
जय शाह म्हणाले की, या विषयावर सर्व फ्रँचायझींशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय देशांतर्गत संघांचेही मत विचारण्यात आले आहे. या नियमाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू दिसल्या. त्याने कबूल केले की अष्टपैलू खेळाडूंचे नुकसान झाले आहे, परंतु अतिरिक्त खेळाडूलाही संधी मिळते. याशिवाय ब्रॉडकास्टर्सचाही विचार मंडळाला करावा लागणार आहे. त्यामुळे ते हटवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.