मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम भारतातच आयोजित केला जाणार आहे. याला आयपीएल अध्यक्षांनी दुजोरा दिला आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचा 17 वा सीझन यूएई किंवा दक्षिण आफ्रिकेत हलवला जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाऊ शकतो. मात्र, अंतिम तारीख अद्याप ठरलेली नाही. पण टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय टीम इंडियाच्या खेळाडूंना 8 ते 10 दिवसांचा वेळ देऊ इच्छित आहे.
वृत्तसंस्था IANS शी बोलताना IPL चेअरमन अरुण धुमल यांनी दावा केला की 17वा सीझन भारतात आयोजित केला जाईल. अरुण धुमल म्हणाले, “आयपीएलचा 17वा हंगाम फक्त भारतातच खेळवला जाईल. बीसीसीआय लवकरच आयपीएलच्या १७व्या हंगामाच्या तारखा जाहीर करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आम्ही वाट पाहत आहोत. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच आम्ही आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करू.
स्पर्धा परदेशात हलवली जाणार नाही
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या 17व्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे पर्यंत खेळवला जाऊ शकतो. 5 जूनपासून टी-20 विश्वचषक सुरू होणार असल्याने बीसीसीआय खेळाडूंना तयारीसाठी 8 ते 10 दिवसांचा वेळ देऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचा 17वा सीझन भारताऐवजी परदेशात हलवला जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएलचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता. 2014 मध्ये देखील लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचा पूर्वार्ध यूएईला हलवण्यात आला होता. पण यावेळी बीसीसीआय आयपीएलचा 17वा हंगाम लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतात आयोजित करणार आहे.