मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. या T20 लीगचा पहिला टप्पा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. सलामीच्या लढतीत सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना 22 मार्चला चेन्नईत होणार आहे. देशातील आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, पहिल्या 17 दिवसांसाठी आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. याआधी 2019 मध्ये देखील आयपीएलचे वेगवेगळ्या टप्प्यात आयोजन करण्यात आले होते.
आयपीएलद्वारे T20 विश्वचषक 2024 ची तयारी:
भारतासह परदेशी खेळाडू आयपीएलद्वारे आगामी टी20 विश्वचषक 2024 साठी तयारी करतील. या वर्षी जून-जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. निवडकर्ते आपापल्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवतील.
मोहम्मद शामी आयपीएलमधून बाहेर
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. शामी सध्या टाचेच्या दुखापतीने त्रस्त आहे. यातून सावरण्यासाठी त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत त्याच्यावर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया होऊ शकते. शामीचे संपूर्ण आयपीएल 2024 सीझनमधून बाहेर पडणे हा गुजरात जायंट्ससाठी मोठा धक्का आहे.
IPL 2024 च्या लिलावात 72 खेळाडूंची विक्री
याआधी IPL 2024 च्या डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात एकूण 72 खेळाडू विकले गेले होते. यामध्ये 30 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. एकूण 10 फ्रँचायझींनी 230.45 कोटी रुपये खर्च केले. या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला सर्वात महागात विकत घेतले. केकेआरने स्टार्कला 20.75 कोटी रुपयांना विकत घेतले आणि तो या लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना, तर न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला चेन्नईने 14 कोटी रुपयांना खरेदी केले.