जयपूर: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 28 मार्च रोजी सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण वाटत होते, तरीही राजस्थानने 185 धावा केल्या. राजस्थानने 36 धावांच्या स्कोअरवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण अशा परिस्थितीत रियान परागने अर्धशतक झळकावून संघाला संकटातून वाचवले. रियान परागने 45 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. दरम्यान, रविचंद्रन अश्विननेही 19 चेंडूत 3 षटकार लगावत 29 धावांची शानदार खेळी केली. राजस्थानने शानदार फलंदाजी करत शेवटच्या 5 षटकात 77 धावा केल्या.
दिल्लीला 186 धावांचे लक्ष्य
राजस्थान रॉयल्सने प्रथम करताना 185 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल खेळताना पहिल्याच चेंडूपासून अडचणीत दिसला आणि केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जोस बटलरची बॅट सलग दुसऱ्या सामन्यात शांत राहिली, त्याने केवळ 11 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनला सुरुवात निश्चितच मिळाली, पण 14 चेंडूत केवळ 15 धावा करून तो बाद झाला. रविचंद्रन अश्विन आणि रियान पराग यांच्यातील 54 धावांच्या भागीदारीमुळे राजस्थानाने पुनरागमन केले.
15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 108 धावा होती, मात्र शेवटच्या 5 षटकांत रियान परागने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात एकूण 77 धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत शिमरॉन हेटमायरनेही 7 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 14 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात एनरिक नॉर्टजेने 25 धावा दिल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या 185 पर्यंत पोहोचली.
दिल्ली कॅपिटल्सकडून पहिली विकेट मुकेश कुमारने घेतली, ज्याने यशस्वी जैस्वालला क्लीन बोल्ड केले. खलील अहमदने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात 24 धावा देत 1 बळी घेतला. अक्षर पटेलनेही 4 षटकात केवळ 21 धावा देऊन 1 बळी घेतला, तर कुलदीप यादवने 1 बळी घेतला पण 4 षटकात 41 धावा दिल्या. मुकेश कुमारने शेवटच्या 2 षटकात 30 धावा दिल्या. ॲनरिक नॉर्टजे सीझनचा पहिला सामना खेळत होता आणि त्याने 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.