(IPL 2023) पुणे : आयपीएल २०२३ ची पहिली लढत आता फक्त काही तासांवर आली आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. नव्या हंगामातील पहिली लढत गेल्या वर्षी पहिल्यांदाच स्पर्धेत उतरलेल्या आणि विजेतेपद मिळवलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
गुजरात टायटन्स आयपीएलमधील नवा संघ…!
गुजरात टायटन्स आयपीएलमधील नवा संघ आहे. पण या नव्या संघाने पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवण्याची कमाल करून दाखवली. त्यामुळे चेन्नई आणि गुजरात यांच्यात फक्त दोन लढती झाल्या आहेत. या दोन्ही लढतीत गुजरात संघाचा दबदबा पाहायला मिळाला होता. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नईविरुद्ध झालेल्या दोन्ही लढतीत गुजरातने बाजी मारली होती.
पहिल्या लढतीत ३ तर दुसऱ्या लढतीत ७ विकेटनी गुजरातने विजय मिळवला होता. ही आकडेवारी पाहता उद्या होणाऱ्या पहिल्या लढतीत गुजरातचे पारडे जड आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा चेन्नई आणि गुजरात संघ यांच्यातील हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर या सामन्याची नाणेफेक ७ वाजता होईल.
दरम्यान, पदार्पणात विजेतेपद मिळवून हार्दिक पंड्याच्या गुजरात संघाने सर्वांना चकित केले. समतोल संघ ही त्यांची बाजू संपूर्ण स्पर्धेत उजवी ठरली होती. यंदाही जवळपास तोच संघ असल्यामुळे आत्मविश्वास त्यांच्या बाजूने आहे; परंतु समोर चार विजेतेपद मिळवणारा आणि भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी असल्यामुळे गुजरातसाठी सलामीची ही लढत सोपी असणार नाही.