पुणे: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० सामना झाला. इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने नाबाद ६३ धावांची खेळी केली. हा सामना जिंकून भारताने स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आणला. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा सर्व संघ अवघ्या ९९ धावांमध्ये गुंडाळला होता. भारतासमोर विजयासाठी १०० धावांचं आव्हान दिलं. भारताने २ गडी गमवून ११.४ षटकात १०२ धावा केल्या. हे आव्हान पार करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी ६१ धावांची सलामी दिली. यात स्मृती मानधनाचा ४४ धावांचा तर शेफाली वर्माचा १६ धावांचे योगदान होते. स्मृती मानधनाने षटकार खेचत आपले अर्धशतक दणक्यात साजरे केले.
दरम्यान, शेफाली बाद झाल्यानंतर आलेल्या एस मेघनाने स्मृतीला चांगली साथ देत भारताला १० षटकात ९२ धावांपर्यंत पोहचवले. मात्र विजयासाठी ६ धावांची गरज असताना तिला ओमैमा सोहैलने १४ धावांवर बाद केले. अखेर स्मृती आणि जेमिमाहने १२ व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.