पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या २५९ धावांवर आटोपला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलंच अडचणीत आणलं. आता न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजींनी सुद्धा भारतीय फलंदाजांना चांगलंच अडचणीत आणलं आहे.
भारताचा अर्धा संघ माघारी
भारतीय संघाने पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा डाव २५९ धावांवर रोखला. त्यानंतर भारतीय संघाला शेवटचे काही षटक फलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारताने पहिल्या दिवशी एक गडी गमावून १६ धावा केल्या. रोहितच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. रोहित शून्यावर माघारी परतला. सामन्यातील दुसऱ्या दिवशी (२५ ऑक्टोबर) शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने भागीदारी करत चांगली सुरुवात करुन दिली. मात्र ही भागीदारी फार काळ तग धरू शकली नाही. शुभमन गिल ३० धावा करत माघारी परतला. गिल बाद झाल्यानंतर विराट कोहलीही एक धाव करत झटपट माघारी परतला.
संघातील प्रमुख फलंदाज माघारी परतल्यानंतर जयस्वाल आणि पंतवर मोठी जबाबदारी होती. मात्र जयस्वालही ३० धावांवर माघारी परतला. आता सर्व जबाबदारी रिषभ पंत आणि सरफराज खानवर होती. मात्र रिषभ पंत १८ आणि सरफराज खान ११ धावांवर माघारी परतले. सुरुवातीच्या २ तासातच भारताचे ७ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर आर अश्विनही स्वस्तात माघारी परतला. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनरने भारतीय फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. लंचपर्यंत भारतीय संघाला ७ गडी बाद १०७ धावा करता आल्या आहेत.