नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारतीय हॉकी संघ आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हॉकी इंडियाने पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा केली असून या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग याच्याकडे सोपवण्यात आले आहे, तर उपकर्णधार म्हणून हार्दिक सिंगला जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय हॉकी संघात गेल्या ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या काही वरिष्ठ खेळाडूंसह नवीन पाच खेळाडूही ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत. भारतीय खेळाडू सध्या बेंगळुरू येथील साई केंद्रातील राष्ट्रीय शिबिरात ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त आहेत.
भारतीय हॉकी संघ जाहीर
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाला गतविजेत्या बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंडसह पूल ‘बी’मध्ये स्थान देण्यात आले आहे. पूल पॉइंट टेबलमधील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. यावेळी भारताला आपल्या पदकाचा रंग बदलण्यासाठी मागच्या वेळेपेक्षा दमदार खेळ दाखवावा लागणार आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंनी सज्ज असलेल्या या संघात ही कामगिरी करण्याची ताकद आहे.
भारतीय संघाबद्दल मोठ्या गोष्टी
अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेश आणि मिडफिल्डर मनप्रीत सिंग चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत, तर कर्णधार हरमनप्रीत सिंग, संजय, राज कुमार पाल, अभिषेक आणि सुखजीत सिंग हे तिसरे ऑलिंपिक खेळणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या ऑलिम्पिकमध्ये संघाचा भाग असलेल्या नीलकांत शर्माला पर्यायी खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. दिलप्रीत सिंगला संघात संधी मिळालेली नाही. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी गोलकीपर कृष्णा पाठक हा पर्यायी खेळाडू असेल.
टीम इंडियामध्ये डिफेंडर म्हणून हरमनप्रीत सिंग, जरमनप्रीत, अमित रोहिदास, सुमित आणि संजय यांचा समावेश असेल. तर मिडफिल्डमध्ये पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांचा समावेश आहे. फॉरवर्डमध्ये अभिषेक, सुखजीत, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग यांचा समावेश आहे. पाठक आणि नीलकांत यांच्याशिवाय डिफेंडर जुगराज सिंग हा भारताचा तिसरा पर्यायी खेळाडू आहे.
टीम:
गोलकीपर: पी आर श्रीजेश
डिफेंडर: जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह, सुमित, संजय
मिडफील्डर: राजकुमार पाल, शमशेर सिंह, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद
फॉरवर्ड: अभिषेक, सुखजीत सिंह, ललित कुमार उपाध्याय, मंदीप सिंह, गुरजंत सिंह
राखीव खेळाडू : नीलकांत शर्मा, जुगराज सिंह, कृष्ण बहादुर पाठक