मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही घोषणा केली. सन २००७ चा टी-२० वर्ल्ड कप भारताला जिंकून देण्यात जोगिंदर शर्मा याने मोलाची भूमिका बजावली होती.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. भारतीय संघाचे आयसीसी स्पर्धेतील हे दुसरे मोठे विजेतेपद होते. भारताच्या या विजयाचा हिरो मध्यम गतीने गोलंदाजी करणारा जोगिंदर शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Happy retirement, Joginder Sharma. pic.twitter.com/ZWXzI5Rpnf
— Johns. (@CricCrazyJohns) February 3, 2023
निवृत्ती संदर्भात जोगिंदर शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून निवृत्ती घेत आहे. माझे करिअर २००२ साली सुरू झाले आणि २०१७ पर्यंत मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मी बीसीसीआय, हरियाणा, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचा मनापासून आभार व्यक्त करतो. संघातील सहकारी क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता. सर्वांनी दिलेल्या या प्रेमासाठी मनापासून आभार, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५७ धावा केल्या होत्या. गौतम गंभीरने ५४ चेंडूत ७५ धावा तर रोहित शर्माने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात पाकिस्तानला १३ धावांची गरज होती आणि धोनीने चेंडू शर्माच्या हातात दिला. २० व्या षटकाच्या तिसऱ्या चेडूंवर मिसबाहचा कॅच श्रीसंतने घेतला आणि टीम इंडियाने विश्वविजेतेपद मिळवले.
जोगिंदरने भारतासाठी ४ टी-२० लढती खेळल्या, यात ४ गडी बाद केले. तर ४ एकदिवसीय लढतींमध्ये १ गडी आणि ३५ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने १६ सामन्यात १२ विकेट आणि ३६ धावा केल्या. जोगिंदर सध्या हरियाणा पोलिसमध्ये उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत.