पुणे : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी २० सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. या सामन्यात विंडीजने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी निष्प्रभ ठरली. संपूर्ण भारतीय संघ १९.४ षटकांमध्ये केवळ १३८ धावांवर गुंडाळला गेला.
कर्णधार रोहित शर्मा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकात सूर्यकुमार यादव (११), पाचव्या षटकात श्रेयस अय्यर (१०) आणि सातव्या षटकात ऋषभ पंत (२४) एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर हार्दिक आणि जडेजाने पाचव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. मात्र, १४ व्या षटकात होल्डरने पंड्याला बाद करून भारताला पाचवा धक्का दिला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १९.४ षटकांत सर्वबाद १३८ धावांवर आटोपला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३१ आणि रवींद्र जडेजाने २७ धावा केल्या. तर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने ४ षटकात १७ धावा देत ६ बळी घेतले. प्रत्युत्तरात विंडीज संघाने ५ विकेट्सवर १४५ धावा करत सामना जिंकला. सलामीवीर ब्रेंडन किंगने सर्वाधिक ६८ धावांची खेळी खेळली.
दरम्यान, अखेरच्या षटकात विजयासाठी १० धावांची गरज होती. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माने हे षटक वेगवान गोलंदाज आवेश खानला दिले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आवेशने अशी चूक केली, ज्यामुळे सामना भारताने गमावला. आवेशने पहिला चेंडू नो-बॉल केला. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या डेव्हॉन थॉमसने पुढच्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला.