IND vs SA 1st Test: सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळली जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्सवर 208 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. केएल राहुलने शानदार शतक झळकावले. टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने 137 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार मारले.
दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कागिसो रबाडाने 20 षटकांत 59 धावांत 5 खेळाडू बाद केले. पहिली कसोटी खेळताना नांन्द्रे बर्गर ३ बळी घेतले. मार्को यानसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना 1-1 यश मिळाले.
बुधवारी भारतीय संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 8 बाद 208 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. आज टीम इंडियाला पहिला झटका 238 धावांवर बसला. 22 चेंडूत 5 धावा करून मोहम्मद सिराज जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर बाद झाला. पहिल्या दिवशी केएल राहुल 70 धावांवर नाबाद परतला होता. आज त्याने शतकाचा आकडा गाठला. शतक झळकावल्यानंतर केएल राहुल नांन्द्रे बर्गरच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुलशिवाय इतर भारतीय फलंदाज पन्नास धावांचा टप्पा गाठण्यात अपयशी ठरले. विराट कोहलीने 38 धावांचे योगदान दिले. पण केएल राहुलने खालच्या फळीतील फलंदाजांसह टीम इंडियाची धावसंख्या 245 धावांपर्यंत नेली.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनकडे परतत राहिले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने 17 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा ५ धावा करून बाहेर पडला. शुभमन गिल 2 धावा करून नांन्द्रे बर्गरचा बळी ठरला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अनुक्रमे 38 आणि 31 धावा केल्या. केएल राहुलच्या शतकामुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला. मात्र, आता भारतीय गोलंदाज कोणती कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.