India vs Pakistan U19 Final : दुबईत सुरू असलेल्या अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा मोठ्या फरकाने पराभव केला. आयसीसी अकॅडमी मैदानावर झालेल्या या लढतीत पाकिस्तानने भारतावर तब्बल 191 धावांनी विजय मिळवून विजेतेपद पटकावले. (India vs Pakistan U19 Final)
पाकिस्तानने आधी फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 347 धावा केल्या. या डावात समीर मिन्हास हा पाकिस्तानकडून हिरो ठरला. त्याने जबरदस्त फलंदाजी करत 172 धावांची खेळी केली. या खेळीत 17 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. अवघ्या 71 चेंडूंमध्ये त्याने शतक पूर्ण केले.
इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे फक्त 2 धावा करून माघारी परतला. त्यानंतर एकामागोमाग एक विकेट पडत गेल्या. भारताचा एकही टॉप ऑर्डर फलंदाज मैदानावर टिकू शकला नाही.
वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूंमध्ये 26 धावा करत थोडा संघर्ष केला, पण तोही लवकर बाद झाला. दीपेश देवेंद्रनने 36 धावा करत सर्वाधिक धावा केल्या. मात्र उर्वरित फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि भारताचा डाव 156 धावांत संपला.
पाकिस्तानकडून अली रजाने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद सयाम, अब्दुल सुबहान आणि हुजैफा हसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली.
विशेष म्हणजे, साखळी फेरीत भारताने पाकिस्तानला 90 धावांनी हरवले होते. पण अंतिम सामन्यात पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत भारताचा पराभव केला. भारताचे स्टार खेळाडू फायनलमध्ये चालले नाहीत आणि याचाच फायदा घेत पाकिस्तानने आशिया कप जिंकला. (India vs Pakistan U19 Final)







