मेलबर्न: भारताचा पुरुष संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उभय संघांत तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० लढती खेळवण्यात येतील, बॉर्डर गावसकर करंडक मालिकेनंतर भारतीय संघ या दौऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाशी मर्यादित षटकांच्या मालिकेत दोन हात करताना दिसेल. कॅनबरा आणि होबार्टमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल, तर पर्थ, अॅडलेड आणि सिडनीत एकदिवसीय मालिकेतील लढती निश्चित करण्यात आल्या आहेत.
पुरुषांप्रमाणे महिला संघ १५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. एक कसोटी, तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या लढती उभय संघांत पार पडतील. १५ फेब्रुवारी रोजी सिडनीत टी-२० मालिकेतील पहिली लढत खेळवण्यात येईल. त्यानंतर मनुका ओवाल आणि अॅडलेड ओव्हल येथे मालिकेतील उर्वरित लढती पार पडतील. २४, २७ आणि १ मार्च रोजी एकदिवसीय मालिकेतील लढती निश्चित करण्यात आल्या आहेत. उभय संघांतील एकमेव कसोटी लढत ६ ते ९ मार्च रोजी वाका येथे खेळवण्यात येईल.