मुंबई : मगील सामन्यातील निराशाजनक पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध रविवारी (ता. १७) होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमनाचा भारतीय संघाचा निर्धार आहे. या सामन्यात विजयासह मालिका जिंकायची असल्यास भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे.
एकदिवसीय मालिकेपूर्वी झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यावर भर दिला होता. त्यानंतर आमचा संघ एकदिवसीय मालिकेतही सकारात्मक मानसिकतेनेच खेळेल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात २४७ धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ढेपाळली.
रोहित आणि शिखर धवन यांना आक्रमक सुरुवात करून देण्यात अपयश आले. रीस टॉपली आणि डेव्हिड विली यांच्या िस्वग व वेगवान गोलंदाजीविरुद्ध दोन्ही सलामीवीर चाचपडताना दिसले. तसेच विराट कोहली आणि ऋषभ पंतही लवकर बाद झाले. त्यामुळे भारताला फलंदाजीच्या शैलीबाबत पुनर्विचार करावा लागणार आहे.
इंग्लंडच्या फलंदाजांनाही या मालिकेत छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ज्या संघाचे फलंदाज अधिक दर्जेदार कामगिरी करतील, त्यांना विजयाची अधिक संधी असेल. शनिवारी संपूर्ण भारतीय संघाने जोरदार सराव केला. मैदानाचा एक भाग प्रेक्षकांकरिता बंद आहे. कारण नवीन स्टॅन्ड उभारण्याचे काम जोरात चालू आहे. रविवारचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० ला सुरू होणार आहे.