पुणे : आशिया कप 2022 सुरु झाला असून आज क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाक असं युद्ध रंगणार आहे. आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी खूप मोठा आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची जगभरातील कोट्यवधी भारतीय क्रिकेट रसिकांना उत्सुक्ता असते. दुबईमध्ये संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट टीम आमनेसामने येणार आहेत. या सामन्याचा एक वेगळा दबाव असतो, हे खेळाडूंनी सुद्धा अनेकदा मान्य केले आहे.
भारताने पाकिस्तानवर नेहमीच वर्चस्व मिळवलेले आहे, पण साधारणतः नऊ महिन्यांपूर्वी ज्या मैदानात ही परंपरा खंडित झाली होती, त्याच मैदानातून पुन्हा नव्या मोहिमेची सुरुवात करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला मिळणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकने भारताचा पराभव केला होता, त्याच मैदानावर आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पुन्हा भारत-पाक सामना होत आहे. दोन्ही संघांतील क्रिकेट लढतींचा नवा अध्यायही सुरू होत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना विजयच हवा असतो. पराभव पचवणं खूप कठीण असतं.
विराटचा १०० वा सामना
पाकिस्तानविरुद्ध होणारा हा सामना विराट कोहलीचा १०० वा ट्वेन्टी-२० सामना असणार आहे. या प्रकारात सामन्यांचे शतक करणारा तो पहिला भारतीय ठरणार आहे. आतापर्यंतच्या ९९ सामन्यांत विराटने ५०.१२ च्या सरासरीने ३३०८ धावा केल्या आहेत. नाबाद ९४ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
पाकिस्तानविरूद्ध भारताचं संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह.
या ठिकाणी पहा सामना
भारत आणि पाकिस्तानात आशिया कप २०२२ चा सामना संध्याकाळी ७. ३० वाजता सुरु होईल. संध्याकाळी ७ वाजता टॉस उडवला जाईल. भारत आणि पाकिस्तान मधील आशिया कप २०२२ सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर होईल. तसेच लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी हॉटस्टार वरहि होणार आहे.