बंगळूरु: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. टीम इंडियाने अलीकडेच कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लीन स्वीप दिला. आता घरच्या मैदानावर त्यांचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळूरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकार परिषद घेऊन आपल्या खेळाडूंच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनावर मोठे वक्तव्य केले आहे.
संघाच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनात कोणताही बदल होणार नाही
गौतम गंभीरने न्यूझीलंड मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जितकी जास्त जोखीम घेतली जाईल, तितका जास्त फायदा होईल, असा त्याचा विश्वास आहे. अलीकडेच टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत अतिशय वेगवान धावा केल्या होत्या, ज्यामुळे पावसामुळे दोन दिवस एकही चेंडू टाकला गेला नाही. तरीही त्यांनी कानपूर कसोटी सामना सात विकेटने जिंकला होता. गंभीरवर विश्वास ठेवला तर, टीम इंडिया भविष्यातही असेच खेळत राहील, हे स्पष्ट आहे.
गंभीर म्हणाला, ‘आम्हाला आमच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे का? जर आमचे खेळाडू नैसर्गिक क्रिकेट खेळू शकतात, एका दिवसात 400 ते 500 धावा करू शकतात, तर त्यात गैर ते काय? ‘जेवढी जोखीम जास्त, तेवढा परतावा जास्त आणि जोखीम जास्त, तर अपयशाची शक्यताही जास्त’ ही वृत्ती आपण कायम ठेवणार आहे. एक दिवस असा येईल, जेव्हा आमचा संघ १०० धावांवर बाद होईल. पण, आम्हाला ते स्वीकारावे लागेल. उच्च जोखमीचे क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही आमच्या खेळाडूंना पाठिंबा देत राहू. आम्हाला या पद्धतीने पुढे जायचे आहे आणि परिस्थिती कशीही असली तरी परिणाम साध्य करायचे आहेत.
गौतम गंभीर पुढे म्हणाला, ‘मी चेन्नईत सांगितले होते की, आम्हाला असा संघ हवा आहे, जो एका दिवसात 400 धावा करू शकेल आणि दोन दिवस फलंदाजी करून सामना ड्रॉ करू शकेल. याला पुढे जाणे म्हणतात. याला परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणतात. हे कसोटी क्रिकेट आहे. जर तुम्ही नेहमी त्याच मार्गावर राहिलात तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.
तो म्हणाला, ‘आमच्या संघात असे अनेक फलंदाज आहेत, जे दोन दिवस फलंदाजी करू शकतात. सामना जिंकणे हे निश्चितच आमचे पहिले लक्ष्य असेल. सामना अनिर्णित ठेवण्यासाठी खेळावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली, तर आमच्यासाठी हा दुसरा किंवा तिसरा पर्याय असेल.
न्यूझीलंड संघाचे कडवे आव्हान
गंभीरने कबूल केले की, या मालिकेत न्यूझीलंड संघ त्याच्यासमोर खडतर आव्हान देऊ शकतो. परंतु, अनुकूल निकाल मिळविण्यासाठी ते कोणतीही कसर सोडणार नाहीत. तो म्हणाला, ‘न्यूझीलंड पूर्णपणे वेगळे आव्हान सादर करेल. आम्हाला माहित आहे की, त्यांच्याकडे खूप चांगला संघ आहे आणि त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत, जे आम्हाला फटका देऊ शकतात, त्यामुळे हे तीन कसोटी सामने खडतर आव्हान असतील. न्यूझीलंड असो की ऑस्ट्रेलिया, आम्हाला आमच्या देशासाठी प्रत्येक सामना जिंकायचा आहे. आम्ही सध्या पुढचा विचार करत नाही. सध्या आमचे लक्ष फक्त न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेवर आहे.