मुंबई: स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेसाठी टीम इंडियात पुनरागमनाचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला दिसत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेची चांगली कामगिरी होत नाही. छत्तीसगडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात अजिंक्य रहाणे अवघी 1 धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. परिस्थिती अशी आहे की, रणजी ट्रॉफीच्या या मोसमात खेळल्या गेलेल्या 6 डावांमध्ये रहाणेच्या बॅटमधून केवळ 34 धावा झाल्या आहेत. टीम इंडियात पुनरागमनाचे स्वप्न पाहणाऱ्या अजिंक्य रहाणेला आता मुंबई संघातून वगळले जाण्याचा धोका आहे.
रणजी ट्रॉफीच्या या मोसमात अजिंक्य रहाणेला अजिबात फॉर्म मिळालेला नाही. फॉर्म व्यतिरिक्त रहाणे फिटनेसच्या समस्यांशीही झुंजत आहे. दुखापतीमुळे रहाणे दोन सामन्यांचा भाग होऊ शकला नाही. याशिवाय रहाणेची 6 डावात सर्वाधिक धावसंख्या केवळ 16 धावा आहे. दोनदा रहाणेला खातेही उघडण्यात यश आले नव्हते. उर्वरित तीन डावात रहाणेने 8, 9 आणि एक धावा काढल्या. एवढ्या खराब कामगिरीनंतर रहाणेकडे टीम इंडियात परतण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही.
रहाणेचे स्वप्न पूर्ण होणार नाही
अजिंक्य रहाणेने अलीकडेच भावूकपणे सांगितले की, त्याला टीम इंडियासाठी 100 कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र, आता अजिंक्य रहाणेचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहू शकते. रहाणेने भारतासाठी आतापर्यंत ८५ कसोटी सामने खेळले आहेत. गेल्या वर्षी रहाणेला भारतासाठी पुनरागमन करण्याची संधी मिळाली. रहाणेने डब्ल्यूटीसी फायनलच्या दोन्ही डावांमध्ये शानदार कामगिरी केली. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर रहाणेची बॅट अपयशी ठरली. यानंतर रहाणेला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता भविष्यातील संघ तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.