IND vs ENG राजकोट: कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 207 धावा आहे. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंड भारतापेक्षा 238 धावांनी मागे आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. आज दिवस अखेरीस इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेट आणि जो रूट नाबाद परतले. बॅन डकट 133 धावा करून खेळत आहे. तर जो रूट ९ धावा करून क्रीजवर आहे.
भारताकडून रवी अश्विन आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. रवी अश्विनने सलामीवीर जॅक क्रॉलीला बाद केले. यासह रवी अश्विनने कसोटीत ५०० बळींचा आकडा गाठला. जॅक क्रॉलीने 15 धावा केल्या. ओली पोप 39 धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला.
भारतीय संघाने केल्या 445 धावा
याआधी भारताचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला होता. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 5 बाद 326 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. पण पहिल्या दिवसाचे नाबाद फलंदाज रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र यानंतर ध्रुव जुरेल, रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाला ४४५ धावांपर्यंत मजल मारता आली.
रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने शतके झळकावली
भारताकडून रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी केली. रोहित शर्माने 131 धावांचे योगदान दिले. तर रवींद्र जडेजाने 112 धावा केल्या. याशिवाय सरफराज खानने पदार्पणाच्या कसोटीत 62 धावांची आकर्षक खेळी केली. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज मार्क वुडने सर्वाधिक 4 बळी घेतले. रेहान अहमदला 2 विकेट घेण्यात यश मिळाले. याशिवाय जिमी अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.